Type Here to Get Search Results !

महिलांचे आरोग्य व रोजगार विषयक मार्गदर्शनासाठी उद्योजक राम निंबाळकर प्रयत्नशील

 *निंबळक गावाच्या सर्वांगीण विकासानंतर आता महिलांचे आरोग्य व रोजगार विषयक मार्गदर्शनासाठी उद्योजक राम निंबाळकर प्रयत्नशील* 

       फलटण दि. ६ : निंबळक ग्रामस्थांना आरोग्य, शिक्षण, रस्ते, पिण्याचे पाणी आणि गावाचा सर्वांगीण विकास, गरजूंना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात नेहमीच आघाडी घेतलेल्या उद्योजक राम निंबाळकर यांनी महिलांमध्ये त्यांच्या व्यक्तिगत आरोग्याविषयी जागरुकता आणि महिलांना उद्योग व्यवसायाविषयी मार्गदर्शन याकडे लक्ष देत आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबीराला गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत माहिती व मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

     उद्योजक राम निंबाळकर यांच्या संकल्पनेतुन निंबळक ग्रामपंचायत उदयसिंह निंबाळकर सभागृहात आयोजित महिला आरोग्य जागरुकता आणि उद्योजकता मार्गदर्शन शिबीरात डॉ. श्रीमंत सौ. संयुक्ताराजे खर्डेकर यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले.  ग्रामीण महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये, असे आवाहन करत त्यांनी बदलत्या जीवनशैलीनुसार घ्यावयाची काळजी आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व उपस्थित महिलांना पटवून दिले.

        महिलांनी केवळ घरकामात मर्यादित व्यस्त न राहता, स्थानिक संसाधनांचा वापर करुन छोटे-मोठे उद्योग सुरु करावेत असे आवाहन करताना महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना आणि बाजार पेठेच्या संधींची माहिती यावेळी डॉ. सौ. संयुक्ताराजे खर्डेकर यांनी या महिलांना दिली

     उद्योजक राम निंबाळकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी योग्य दिशा आणि प्रोत्साहन मिळाले असल्याने आगामी काळात निंबळक व परिसरातील  महिलांनी उद्योग व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केल्यास त्यांना आवश्यक ती संपूर्ण मदत व मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्याची ग्वाही संयोजकांच्यावतीने यावेळी देण्यात आली.

    प्रारंभी सरपंच सौ. सीमा बनकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत आणि डॉ. सौ. संयुक्ताराजे खर्डेकर यांचा यथोचित सन्मान केल्यानंतर शिबीराचा उद्देश स्पष्ट करताना उद्योजक राम निंबाळकर यांचे निंबळक व पंचक्रोशीच्या सर्वांगीण विकासाकडे बारकाईने लक्ष असल्याने त्यांनी या भागात विविध शासकीय योजना प्राधान्याने राबवितानाच स्वतःच्या निधीतून निंबळक गावाच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविले असल्याचे निदर्शनास आणून दिले.

       या शिबीराला निंबळक व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण विकासात महिलांचे योगदान वाढविण्यासाठी अशा शिबीरांची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी उपसरपंच सौ. गौरी ढमाळ, माजी उपसरपंच सौ. जयश्री मोरे, माजी सरपंच सौ. मोहिनी मतकर,  सौ. संगिता निंबाळकर, श्रीमती लक्ष्मीबाई कापसे, सौ. मंदाकिनी निंबाळकर, माजी उपसरपंच सौ. मंगल जाधव आणि महिला पदाधिकाऱ्यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 


फोटो : डॉ. सौ. संयुक्ताराजे खर्डेकर यांच्या समवेत सरपंच सौ. सीमा बनकर व अन्य महिला पदाधिकारी, दुसऱ्या छायाचित्रात शिबीरास उपस्थित महिला.


Post a Comment

0 Comments